चित्रपट म्हणजे वास्तव नाही
थिएटरमध्ये 'फुकरे' सिनेमा सुरू होतो. चुचा आणि हनी यांचे
कारनामे प्रत्येक टप्यावर पाहताना हसायला येतं. चुचाला
रात्री चित्र-विचित्र स्वप्नं पडतात. या स्वप्नात दुसऱ्या दिवशी
येणाऱ्या लॉटरीचं कोडं असतं. त्याचा मित्र हनी त्याच्या
स्वप्नांचा अर्थ समजावून सांगतो. मग हे दोघे मिळून
लॉटरीच्या माध्यमातून पैसे कमवण्याचा निर्णय घेतात. यात
अजून दोन मित्रांना सामील करून घेतलं जातं. पुढे एका
महिलेकडून हे कर्ज घेतात. नशीब आजमावत तर पदरी
निराशा येते. मग जिच्या कडून पैसे घेतलेले असतात ती
यांच्याकडे त्यासाठी तगादा लावते. वेगवेगळ्या मार्गाने
चौघांचा छळ होतो. या छळातून बाहेर पडत या महिलेची
अटक घडवून आणतात. असा एकदंर हा सिनेमा. पण
सिनेमात दाखवले जाणारे प्रेम प्रकरणे, गैर मार्गाने पैसे
कमावण्याचा प्रयत्न, पैसे उकळण्याची पद्धत हे सर्व एक
प्रेक्षक म्हणून मला खटकतं. कारण चित्रपटात ज्या प्रकारे
गुन्हेगारी प्रवृत्तीचे उदात्तीकरण केले जाते ते पाहून तरुणांना
हेच सत्य वाटण्याचा संभव आहे. फुकरे हे फक्त एक
उदाहरण आहे. फुकरे प्रमाणे अनेक उदाहरणे आपल्याला
देता येतील. आताच्या गली बॉय पासून ते कबीर सिंग पर्यंत
अशी अनेक उदाहरणे देता येतील.
या अशा चित्रपटाच्या निर्मितीने समाजावर विपरीत परिणाम
घडणार असतील. तर नक्कीच या चित्रपटांचा नव्याने विचार
व्हायला हवा. २००२ मध्ये एक अख्खा देश या चित्रपटाच्या
जाळ्यातून बाहेर पडला होता तो देश म्हणजे भूतान. भूतानने
देशातील वाढती गुन्हगारी पाहता सरसकट सर्वच चित्रपटांना
नारळ दिला होता. आपल्याही देशात गुन्हेगारी वाढण्याच्या
कारणांत चित्रपटांचा वाटा मोठा आहे. हे दाखले देण्याचा
उद्देश हाच आहे, की वाढत्या गुन्ह्याची आपण नोंद घेतली
तरच ते कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातील. गुन्हेगारी
कमी करायची तर त्यामागील कारणांची मिमांसा होणे
तितकेच आवश्यक आहे. इथे आपण लक्षात घ्या की मी
'फक्त' चित्रपट असं म्हटलेलं नसून वेगवेगळ्या कारणांमध्ये
'चित्रपट' हे एक कारण असू शकेल एवढंच नमूद केलं आहे.
'एक काळ असा होता जेव्हा नायक आणि नायिका
यांच्यातील प्रेमकहाण्यावर चित्रपट आधारित असत. आज
असे अनेक चित्रपट आहेत जिथे नायक नायिकेचे लक्ष वेधून
घेण्यासाठी नायिकेवर पाळत ठेवतो आणि प्रेक्षक त्याचा
आनंद घेत असतात. यामुळे आपल्या आयुष्यातील
नायिकेला स्वतःकडे आकर्षित करण्याचा हाच सर्वोत्तम मार्ग
आहे असा विचार केला जातो. "हे (बॉलिवूडमधील)
महिलांचे चित्र कसे बदलता येईल याचा आम्ही गांभीर्याने
विचार करत आहोत. आणि मला खात्री आहे की हा (बदल)
होईल आणि त्यात आम्ही प्रमुख भूमिका बजावू,” असं
अभिनेता आणि निर्माता फरहान अख्तर याने एका वहिनीला
दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. कोणतंही दृश्य माध्यम हे
लोकांची मानसिकता घडवण्यासाठी उपयुक्त असतं कारण
त्याचा प्रभाव नुसत्या शब्दांपेक्षा अधिक असतो. त्यामुळे
आपण लोकांना काही देताना त्याचा त्याच्यावर काय
परिणाम होईल याचा विचार करून दिलं गेलं पाहिजे.
चित्रपटांमध्ये फक्त महिलांविषयीच नाही तर जात धर्म
यांच्यावरही अबोध मांडणी केलेली असते.
एक नायक कसाही असला, म्हणजे अगदी बेरोजगार,
व्यसनी, गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारा असला तरी नायिका
त्याच्या प्रेमात पडते. नायिकेच्या प्रेमापश्चात हा नायक
बदलून एक उत्तम नागरिक होतो. हे सर्व काही महिन्यात
घडते आणि तीन तासांच्या चित्रपटात ते रंगवले जाते. वॉन्टेड
चित्रपट घेतला तर आपल्या लक्षात येईल की चित्रपटाचा
नायक हा अमर आहे. तो एका वेळी अनेक खलनायकांच्या
गुंडांना धूळ चारतो. या नायकाला एखाद्या गुन्हेगाराचा
एन्काऊंटर करण्यासाठी कोणत्याच कायद्याची परवानगी
घ्यावी लागत नाही. लागलीच तर नायकासाठी कायदे देखील
वाकवले जातात. यातून खऱ्या आयुष्यात असा एखादा
बेकायदेशीर एन्काऊंटर केला जातो तेव्हा समाजाला त्यात
काहीच गैर वाटत नाही. असेच काही अतिरंजित तसेच
चुकीचा संदेश देणारे चित्रपट बॉक्स ऑफिसवर करोडोंचा
गल्ला कमावतात. तरुणाई चित्रपटातील निरर्थक गाण्याच्या
प्रेमात पडते तेव्हा प्रश्न पाडतो खरंच असे चित्रपट आवश्यक
आहेत का?
कबीर सिंग, लव्ह सेक्स अँड धोका, बदलापूर, फुकरे या
चित्रपटातील गैरप्रकार जेव्हा समाज म्हणून आपण मान्य
करतो त्यावेळी त्या समाजाच्या हातून चांगले घडण्याची
शक्यता कमी होते. अखेरीस एवढंच सांगेन चित्रपट
दाखवयाचेच असतील तर न्यूटन, थ्री इडियट, मसान,
छीछोरे, आर्टिकल 15, सुपर 30 असेही चित्रपट होऊ
शकतात जे लोकांचे प्रबोधन आणि मनोरंजन दोन्ही करू
शकतात.
Comments
Post a Comment