कामाचे टेंशन असे जरी, ऑफिसचे वातावरण ठेवा फ्री
"अरे सूरज, आज डब्यात कोणती भाजी आणली आहेस?
सूरजने तोंड वेंगात उत्तर दिलं, "कारल्याची भाजी!" आणि
त्यावर एकच हशा पिकला. सलग तीन दिवस झाले होते
सूरजच्या डब्यात तीच भाजी असायची. तेवढ्यात कुणाल
म्हणाला, हा आहेच कडू मग कारल्याला तरी कसं याला
सोडावं वाटेल! त्यावर कोणीच हसले नाही आणि काहीसं
हसतखेळतं वातावरण कुणालच्या अशा बोलण्याने बिघडलं.
सूरजला कुणालच्या या बोलण्याचा राग आला आणि यांच्या
दोघात वाद सुरू झाले.
तर साधारणपणे ऑफिस म्हटलं, की या गोष्टी नेहमी घडतच
असतात. चेष्टा, मस्करी करण्याच्या नादात आपण अशा
काही गोष्टी बोलून जातो ज्यामुळे एखाद्याचे मन दुखावते,
राग येतो किंवा प्रसन्न, हसतं खेळतं वातावरण गढूळ होऊन
जातं. कॉर्पोरेट जग किंवा इतर कोणतेही क्षेत्र घेतले, तरी
जिथे आपण काम करतो तिथले वातावरण अगदीच प्रसन्न
आणि आनंदी ठेवणे ही तिथल्या प्रत्येकाची जबाबदारी
असते. त्यामुळे आपल्याकडून चांगल्या वातावरणाचे वाटोळे
होणार नाही याची खबरदारी घेतली, तरी आपोआपच आपण
जेथे काम करतो तिथले वातावरण छान राहील व याचा उत्तम
परिणाम हा आपल्या कामावर सुद्धा होईल हे निश्चित.
सगळ्यांशी हसूनखेळून, मिळून मिसळून राहिल्याने
ज्यांच्यासोबत आपण काम करतो त्यांनाही आणि पर्यायाने
आपल्याला सुद्धा याचा फायदाच होतो. केवळ कलीग, बॉस
किंवा अन्य मोठ्या पदावरील व्यक्तींशी चांगले संबंध असले
म्हणजे झाले असे नाही, तर जे आपल्यासोबत आपल्यासाठी
काम करणारे कर्मचारी, कामगार वर्ग यांच्याशी सुद्धा आपण
तितक्याच आपुलकीने आणि प्रेमाने वागले, तर त्यांनाही
काम करण्यात आनंद आणि उत्साह मिळतो. कामाच्या
मोकळ्या वेळातून थोडीफार एखाद्याची चौकशी जरी केली,
तरी त्याचा अख्खा दिवस यामुळे छान जाऊ शकतो. या
सगळ्या गोष्टी आपण केल्या, तर का नाही आपण जिथे काम
करतो तिथले वातावरण चांगले राहील?
,
एकत्र डब्बा खाणे, वाढदिवस साजरा करणे, प्रमोशन पार्टी
किंवा दिवाळी, ख्रिसमस सारखे सण ऑफिस मधल्या
सगळ्यांनी एकत्र मिळून मिसळून साजरे केले, तरी एकोपा
तयार होऊन एक छान नाते सगळ्यांमध्ये तयार होते.
ऑफिसमधल्या सततच्या व्यापातून थोडासा वेळ हा
वेगवेगळे प्रकारचे खेळ खेळण्यासाठी सुद्धा ठेवावा
जेणेकरून कामाचा ताण थोडासा हलका होतो. शिवाय
आपल्यासोबत असणाऱ्यांना आपल्याला जमेल तशी मदत
केली, तरी चांगले बंध निर्माण होतात. एखाद्याला उत्तम गाता
येत असेल, नकला करता येत असतील, जोक्स, मिमिक्री
करता येत असतील, तर यांचे कार्यक्रम ऑफिसच्या वेळेनंतर
थोड्या वेळासाठी ठेवले, तरी उद्या उठून नव्या दिवसाची,
कामाची सुरूवात करण्यासाठी एक प्रकारचा फ्रेशनेस देऊ
शकतात. तसेच एखाद्याचे काम आवडले, तर त्याच्या कामाचे
कौतुकही जरूर करावे. याने समोरच्या माणसाला काम
करायचा हुरूप येतो आणि एक प्रसन्न व निरोगी वातावरण
तयार होते. अशाप्रकारे आपल्यामध्ये काही चांगले बदल
घडवून आपण आपले कामाचे वातावरण प्रसन्न आणि
निरोगी ठेवण्याचा सगळेच प्रयत्न करूयात.
Comments
Post a Comment