परिस्थितीचे गुलाम बनू नका
प्रबळ इच्छाशक्ती असेल तर आपलं ध्येय हे नक्कीच गाठता
येतं. यश हे कोणत्याही परिस्थितीचं गुलाम नसतं, पण
संघर्षाच्या वेळी माणूस नक्कीच त्याच्या परिस्थितीचा गुलाम
बनतो. त्या गुलामगिरीचं बंधन झुगारून, मेहनतीची कास
धरून तोच माणूस एक दिवस नक्कीच इतिहास रचू शकतो
एखाद्या माणसाच्या आयुष्यामध्ये संकट येऊ शकतात, परंतु
आपण त्या संकटांचा कसा सामना करतो हे आपल्यावर
अवलंबून असतं. मानसिक किंवा शारीरिक दृष्ट्या अपंग
असलेल्या कोणत्याही व्यक्तीला त्याच्या जन्मापासूनच
प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागत असतो. मी
बऱ्याच अपंग लोकांना पाहिलं आहे ज्यांनी अशा प्रतिकुल
परिस्थितीला एक आव्हान म्हणून स्वीकारलं आहे आणि त्या
प्रतिकूलतेच्या विरोधात संघर्ष करून सर्वोत्तम कामगिरी
केली आहे. २०१४ मधील युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस
परीक्षेमध्ये पहिलं स्थान मिळवणारी इरा सिंघल ही याचं एक
उदाहरण. ती 'स्कोलियोसिस' नावाच्या अपंगत्वाने ग्रस्त आहे.
तिने या अपंगत्वाला कधीही स्वतःची कमजोरी मानली नाही
आणि त्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत तिने या परीक्षेत
पहिलं स्थान मिळवलं. तिचा आत्मविश्वास दृढ होता. तिने
तिच्या अपंगत्वाला तिची कमजोरी समजली नाही तर ती
संधी म्हणून घेतली आणि त्यातही तिला यश मिळालं.
त्यामुळे कोणत्याही परिस्थितीचे गुलाम होऊ नका, स्वतःवर,
स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा. एक न एक दिवस नशीब
तुमची परिस्थिती नक्कीच बदलवून टाकेल.
आपल्या समाजामध्ये आपल्या आजूबाजूला आपल्याला
अनेक प्रकारचे लोक दिसतात. यामधील काही प्रचंड यशस्वी
झालेले असतात तर काहीजण अयशस्वी. काहीजण
शून्यामधून विश्व निर्माण करत असतात, तर काही जण
लाखाचे हजार करून ठेवतात. बऱ्याच वेळा आपण अशा
लोकांबद्दल बोलत असताना "त्याचं नशीब चांगलं आहे"
किंवा "त्याचं नशीबच खराब आहे" असं म्हणतो. पण खरी
गोष्ट बऱ्याच वेळा वेगळीच असते. कुणाचंही यश आणि
अपयश याच्या मागे त्या व्यक्तीच्या नशिबापेक्षा त्याच्या
कामाचा, मेहनतीचा जास्त हात असतो. आपल्याला आपलं
काम, वैयक्तिक आयुष्य, शारीरिक आरोग्य, आर्थिक
परिस्थिती ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये कायम मोठं यश
मिळवायचं असेल तर मेहनतीशिवाय पर्याय नसतो. आपली
मेहनत जर १००% असेल तर नशीब सुद्धा आपली साथ देत
असते.
मेहनत आणि सातत्य या गुणांनी आपण परिस्थितीवर मात
करू शकतो. माणसाच्या जीवनामध्ये अनेक वेळा असे प्रसंग
येतात जेव्हा त्या परिस्थितीचा सामना कसा करावा लागतो हे
समजत नसतं. परिस्थितीमुळे निर्माण होणारी अवस्था
स्वतःच इतकी गुंतागुंतीची असते की, समजूतदारपणे आणि
दूरदृष्टीने विचार केला नाही तर निर्णय चुकण्याची शक्यता
असते. कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत संयमाने,
सहनशीलतेने आणि शांततेने निर्णय घेण्याची सवय लावली
पाहिजे, असं झालं तर आपण आपल्या जीवनात नक्कीच
यशस्वी होऊ.
खरं तर असं म्हटलं जातं, की प्रत्येक माणूस त्याच्या
स्वतःच्या नशिबासाठी जबाबदार असतो. आपल्या
जीवनामध्ये अशी परिस्थिती एकदा तरी येते, जी आपल्याला
आपल्या जीवनामध्ये काहीतरी करण्याची संधी देते. आपल्या
आयुष्यात संकटं कधीच सांगून येत नाहीत. आपल्या
आजूबाजूला असेही काही लोक असतात ज्यांच्या
आयुष्यामधील प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते नेहमीच नशिबाला
दोष देत असतात. स्वतःच्या परिस्थितीचा बाऊ करत
असतात. तर असेही काही लोक असतात ज्यांना ह्या
परिस्थितीत एक संधी दिसत असते. केवळ हेच लोक
स्वतःची परिस्थिती आणि नशीब दोन्ही बदलू शकतात.
कारण हे लोक त्या परिस्थितीचे गुलाम होत नाहीत तर त्यावर
मात करत स्वतःचं नशीब घडवत असतात.
Comments
Post a Comment