स्पर्धा परीक्षेतील घोटाळे, घोटाळ्यांच्या स्पर्धा
महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षा संबधित एकापेक्षा एक हादरवून
टाकणारे खुलासे करण्यात येत आहेत. हे बघून परीक्षेतील
घोटाळ्यांच्या स्पर्धाच लागल्या आहेत असं आता वाटू लागलं
आहे. एमपीएससी, आरोग्य विभाग, त्यांनतर म्हाडा आणि
आता टीईटीच्या परीक्षेसंदर्भातही घोळ झालेले पुढे येत
आहेत. महाराष्ट्रात कोण किती मोठा घोटाळा करतो, याचीच
आता स्पर्धा लागलेली आहे. जवळपास सर्व परीक्षा घेणारे
विभाग गोंधळ करण्यात तरबेज झाले आहेत. आता म्हाडाचा
पेपर फुटल्या प्रकरणी पुणे पोलिसांनी दोषी असलेल्या जी.ए.
सॉफ्टवेअर कंपनीच्या डॉ. प्रितिश देशमुख यांना अटक केली.
त्यांच्याबरोबर आणखी दोघांनाही अटक करण्यात आली.
असं अटकेचं सत्रच पुणे पोलिसांनी चालवलं आहे. या अटक
केलेल्या दोन व्यक्तींकडे ४ पेन ड्राईव्ह, टॅब, मोबाईल तसेच
वेगवेगळ्या परिक्षार्थांचे ४० हून अधिक हॉल तिकिट्स
आढळून आले आहेत. त्यामध्ये जानेवारी २०२० मध्ये टीईटी
परिक्षेला बसलेल्या काही परिक्षार्थांचे हॉल तिकीट होते.
टीईटी परीक्षेच्या घोटाळ्याबद्दल तुकाराम सुपे या व्यक्तीला
अटक करण्यात आली. या सुपे नावाच्या व्यक्तीकडे तब्बल
८८ लाख रुपये आणि सोनही सापडलं.
टीईटीच्या परीक्षेमध्ये हा सुपे नावाचा व्यक्ती विद्यार्थ्यांकडून
पैसे घ्यायचा आणि त्यांना सांगायचा की पेपर लिहू नका,
बाकी मी बघून घेईन. टीईटी परीक्षा ही शाळेतील शिक्षकांच्या
नेमणुकीसाठी घेतली गेली होती. शिक्षकांची मोठ्या प्रमाणात
भरती तर झाली नाही, मोठा घोटाळा मात्र झाला. आपल्या
राज्यातले घोटाळे तर बघा, कोणत्या परीक्षेत होत आहेत. .
उद्याचे शिक्षक, डॉक्टर, अधिकारी यांची निवड ज्या स्पर्धा
परीक्षेतून होत असते, त्याच स्पर्धा परीक्षेत घोटाळे होत
आहेत. सातवी, आठवीच्या परीक्षेत काही गोंधळ झाला तर
समजता येईल. इथे तर शासन यंत्रणा चालवणाऱ्या
अधिकाऱ्यांच्या परीक्षेमध्येच गोंधळ होतो आहे, शिक्षकांच्या
निवडीमध्ये घोटाळा होतो आहे. आपण कोणता आदर्श
समाजापुढे निर्माण करत आहोत, याचा गंभीरपणे विचार
करायला हवा.
कोणत्याही देशात, राज्यात स्पर्धा परीक्षा या सर्वात
महत्वाच्या असतात. आपल्या देशातील गुणवत्तेची शेवटची
आणि सर्वात महत्वाची पायरी म्हणजे या स्पर्धा परीक्षा
असतात. या कारणामुळे या परीक्षा आतिशय उच्च दर्जाच्या
आणि कठीण असतात. या सर्व गोष्टींमुळे स्पर्धा परीक्षा
अतिशय सुरक्षित वातावरणात घेतल्या जातात. परीक्षेत
झालेल्या गोंधळानी आणि घोटाळ्यांनी या सर्व बाबींना
हरताळ फासले गेले आहे. या सर्व प्रकरणात याचंच नवल
वाटत आहे की, हे सर्व प्रगत महाराष्ट्रात घडत आहे. उत्तर
प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार या मागास राज्यात अशा गोष्टी
घडायच्या आता तिथेही कमी झालेल्या आहेत आणि
महाराष्ट्रात वाढत आहेत. महाराष्ट्र पुढे जातो आहे की मागे
हाच प्रश्न आता पडला आहे.
आपण एकविसाव्या शतकात आणि तंत्रज्ञानाच्या युगात
रहात आहोत. या तंत्रज्ञानाच्या काळात असे गोंधळ आणि
घोटाळे कमी व्हायला हवेत पण उलट ते वाढत चालले
आहेत. या तंत्रज्ञानाचा वापर चांगल्या गोष्टी करण्याऐवजी
अधिक मोठे घोटाळे करण्यासाठी होतो आहे. राज्य सरकारने
परीक्षेचे कंत्राट दिलेल्या कंपन्याच्या मुसक्या आवळायला
हव्यात. यापुढे अशा गोष्टी थांबवण्यासाठी सरकारी यंत्रणा
वापरणे आणि कडक कायदे करण्याची गरज आहे. परीक्षेत
घोटाळे करणाऱ्या लोकांना चांगलीच शिक्षा करायला हवी.
अशा अनेक कडक उपाय- योजना केल्यावरच असे प्रकार
थांबतील.
Comments
Post a Comment