जीवनात यशस्वी होण्यासाठी काय करावे

'जगात ती लोकं पुढे जातात जे सूर्याला जागे करतात आणि
ती लोकं पाठीमागे राहतात ज्यांना सूर्य जागं करतो... हा
सुविचार काल एका सार्वजनिक मंडळाच्या फळ्यावर
चालता चालता वाचला. काही वेळानंतर घरी आलो तरीही
हा सुविचार लिहिलेला फळा डोळ्यासामोरून जाईना आणि
अचानक मला माझ्या शाळेतले दिवस आठवले. मी इयत्ता ९
वी मध्ये असताना प्रचंड आळशी होतो, दुपारची शाळा
असल्यामुळे सकाळी लवकर उठायला आळस करायचो.
त्यामुळे मला माझे वडील हा सुविचार नेहमी सांगायचे.
त्यांचा हा सुविचार सांगण्यामागचा हेतु मी सकाळी लवकर
उठून अभ्यास करावा, वाचन करावं आणि त्यामुळे सकाळी
लवकर उठून अभ्यासाची सवय लागेल हा असायचा. पण
तेव्हा मात्र मला त्यांचा हा हेतु समजायचा नाही.







मित्रांनो, आपण सर्वजण लहानपणापासून ऐकत आलो
आहोत, की सकाळी लवकर उठणे आरोग्यासाठी चांगले
असते. परंतु बहुतेक लोक त्यांच्या व्यस्त जीवनशैलीमुळे
वेळा पाळत नाहीत. आजच्या धकाधकीच्या जीवनात
प्रत्येकजण रात्री उशिरा झोपतो आणि त्यामुळे दुसऱ्या
दिवशी सकाळी उशिरापर्यंत झोपून राहतो. सकाळी लवकर
उठणे कोणालाही आवडत नाही. पण त्याचे अनेक फायदे
आहेत. लवकर उठल्यामुळे आपण दिवसभर फिट राहतो.
तुम्ही तुमची सर्व कामे वेळेवर करू शकता. तुम्ही रोज
सकाळी उठून चालणे, व्यायाम आणि योगासने करू शकता.
यामुळे तुम्ही निरोगी राहाल.आयुष्यात यशस्वी व्हायचं
असेल, निरोगी रहायचं असेल, तर तुमच्या प्रत्येक दिवसाची
सुरुवात ही रोज सकाळी लवकर उठून करायला हवी

''लवकर निजे,लवकर उठे त्याला आयु-आरोग्य लाभे.' ही
म्हण आपण अगदी आपल्या लहानपणा पासुन ऐकत आलो
आहे. मात्र लवकर जाग येत नाही म्हणुन किंवा आळसामुळे
आज आपण लवकर उठणे हे जवळजवळ विसरुनच गेलो
आहोत. सकाळी लवकर उठल्याने दिवसभरातील कामे
वेळेत होतात व कामाचा ताण कमी होतो.कामे घाईघाईत
करण्याचे किंवा टाळण्याचे प्रमाण कमी होते. साहाजिकच
आपला संपुर्ण दिवस फ्रेश जातो.
याउलट रात्री उशीरापर्यंत जागरण केल्याने शरीराला आठ
तासांची पुरेशी व निवांत झोप मिळत नाही.याचा विपरित
परिणाम आपल्या आरोग्यावर होतो.आरोग्याबाबत अनेक
समस्या निर्माण होतात. मग यावर उपाय म्हणुन आपण
लवकर उठण्याचा प्रयत्न करतो. अनेक लोकांसाठी सकाळी
लवकर उठणे हे खूप अवघड काम असते, परंतु हे खरं आहे,
की जीवनात यश मिळविण्यासाठी सकाळी लवकर उठणे
खूप महत्वाचे आहे. Early to Bed and Early to Rise,
Make a Person Healthy, Wealthy and Wise ही
कविता आपण सर्वांनी इंग्रजीत वाचली असेलच किंवा
ऐकली तर नक्कीच असेल. म्हणजे लवकर झोपण्याची
आणि सकाळी लवकर उठण्याची सवय माणसाला आरोग्य,
संपत्ती आणि बुद्धी देते. तुम्हाला हे माहित असले पाहिजे, की
सकाळी लवकर उठणारे, उशिरा झोपणाऱ्यांपेक्षा जास्त
यशस्वी होतात. सकाळी लवकर उठल्याने माणसाचे मन खूप
वेगाने काम करत असते आणि यावेळी आपण चांगला विचार
करू शकतो. कारण सकाळी मानवी शरीरात ऊर्जेचे प्रमाण
जास्त असते. अशा परिस्थितीत सकाळी लवकर उठून
आपण त्याचा चांगला उपयोग करू शकतो. पहाटे ५ ते रात्री
८ पर्यंतचा वेळ हा सर्वात मौल्यवान वेळ आहे. सकाळी
लवकर उठल्यावर आपल्या कामाचे तास आपोआप वाढतात, जास्त वेळ काम केले, तर तो यशस्वी होतो.जीवन
जगण्याचे योग्य शिक्षण सकाळीच मिळाले, तर जीवन
नक्कीच यशस्वी होते आणि सकाळी उठणे हा यशाचा १००
% सुवर्ण मार्ग आहे.


Comments

Popular posts from this blog

ओमायक्रॉन...! ओ माय गॉड!

परिस्थितीचे गुलाम बनू नका

कामाचे टेंशन असे जरी, ऑफिसचे वातावरण ठेवा फ्री